पीक विम्याबाबत निर्णय पुढील आठवड्यात

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : गतवर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र, आता रब्बी हंगाम उलटून गेला तरी या बाधित शेतकर्‍यांना पीकविम्याची रक्कम मिळालेली नाही. कृषी विभागाकडून याबाबतची आकडेवारी शासनाला सादर करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात शासनाकडून पीकविम्याचे डिक्लेरेशन होईल असे सांगण्यात येत आहे.
मराठवाड्यात गतवर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात प्रचंड अतिवृष्टी झाली. त्यामुळे जवळपास सर्वच महसूल मंडळांमध्ये शेती पिके नष्ट झाली. तत्पूर्वी, हंगामाच्या सुरुवातीला लाखो शेतकर्‍यांनी पीकविमा कंपन्यांकडे प्रीमियमची रक्कम भरून आपले पीक संरक्षित केले होते. अतिवृष्टीनंतर राज्य सरकारने राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांसाठी ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यात बाधित शेतकर्‍यांना सरकारकडून हेक्टरी ८ हजार ५०० रुपयांप्रमाणे मदत जाहीर करण्यात आले. याशिवाय पीकविमा काढलेल्या शेतकर्‍यांना पीकविमा कंपन्यांकडून खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनाची आकडेवारी शासनाकडे पाठविली आहे. त्यानुसार आता पीकविम्याचे डिक्लरेशन होईल. पुढील आठवड्यात डिक्लरेशनची शक्यता आहे.
शेतकरी प्रतीक्षेत
अंदाजे १७ हजार कोटी रुपये मिळतील असे सरकारने म्हटले होते. मात्र, अजूनही शेतकर्‍यांना पीकविम्याची रक्कम संबंधित कंपन्यांकडून मिळालेली नाही. रब्बी हंगाम उलटून गेल्यानंतरही शेतकरी या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. पीकविम्याच्या निकषात गतवर्षीपासून बदल झाला आहे. पूर्वी त्या त्या वेळी पावसामुळे किती नुकसान झाले हे तपासून विम्याची रक्कम निश्चित केली जात होती. परंतु आता प्रत्यक्ष उत्पादन तपासून ही रक्कम निश्चित होत आहे. त्यानुसार कृषी विभागाने नुकतीच ही आकडेवारी शासनाला सादर केली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पीकविम्याचे डिक्लेरेशन होईल असे सांगण्यात येत आहे.